Reg.No - A5024 (Parbhani)
श्री हिंगुलांबिका देवीमाता बाबत सविस्तर माहिती
भावसार क्षत्रियांची कुलदेवता माता श्री हिंगुलांबिका देवी आहे व या देवीच्या कृपेने आमचे पूर्वज क्षत्रिय असूनही परशुरामाच्या क्रोधापासून रक्षिले गेले. या श्री हिंगुलाबीका मातेचे मंदिर पाकिस्थानातील बलुचिस्थान भागात कराचीच्या वायव्वेस सुमारे ५१३ किमी अंतरावर लासबेला नावाच्या शहरात श्री हिंगलाज नावाच्या गावात हिंगुला नदीच्या जवळ हिंगोल पर्वताच्या एका कपारित आहे. या देविला तेथिल मुसलमान नानी माँ असे संबोधतात. हे पवित्र यात्रा स्थान असून अश्विन शुध्द अष्टमीला हिंगुला नदीच्या कुंडात स्नान करुन देविचे दर्शन घेतल्यास मुक्ती मिळते अशी पुराण कालापासून भक्तांची श्रध्दा आहे. मातेचा 32 अक्षरी मंत्र पुढिल प्रमाणे आहे.
ओम हिंगुले परम हिंगुले
अमृतरुपीनी तनुशक्ती मन:शिवे
श्री हिंगुलाये नमो नम:
आता आपण भावसार क्षत्रीयांच्या इतिहासाकडे वळू. आमच्या पूर्वजांची राजधानी पूर्वीच्या सिंधू देशातील ब-हस्पती येथे होती, त्यावेळी भारतात मुसलमान नव्हते व आपल्या देशाला हिंदुस्थान असे संबोधित असत. हिंदुस्थानावर परकीयांकडून सर्वाधिक स्वा-या हया वायव्ये कडूनंच झाल्या. यात अनेक प्रांत व ऐतिहासिक पुरावे नष्ट झाले. क्षत्रियांची वंशावळ टिकवून ठेवणा-या भार ठाकुरांच्या पोथ्या, हस्तलिखित अघापही आहेत. त्याच आधारावरून व दंतकथावरून आपल्या जातीच्या उत्पत्ती बद्दलची माहिती पुढील प्रमाणे : -
रेणुका व मेणका हया दोघी बहिणी होत्या. रेणुकेचे पती ऋषि जमदग्नी आणि मेणुकेचे पती होते राजा सहस्त्रार्जुन. जमदग्नी ऋषि रत्नागिरीच्या समुद्र किना-यावरील आश्रमात तपश्चर्येला बसले होते. रेणुका पाणी भरण्यास गेली असता तिला आपल्या बहिणीचे मेणकेचे पती राजा सहस्त्रार्जून त्यांच्या चौ-यांशी अक्ष यौनी फौजेसह जातांना दिसले. त्यांना पाहून तिला अत्यानंद झाला व तिने जमदग्नी ऋषिजवळ तिच्या मेहुण्यांना त्यांच्या सैन्यासह इच्छा भोजन देण्याचा हट्ट धरला. तिच्या स्त्री हट्टा पुढे जमदग्नी ऋषिना नमत घ्यावेच लागले. माता रेणूका आनंदित होउन राना सहस्त्रार्जुनांना भोजनाचे आमंत्रण देण्यास गेली. इकडे ॠषि जमदग्नीला संकट पडले की, आपल्या कुटीमध्ये कांहीही शिधा सामुग्री नसतांना इतक्या लोकांची भोजनाची व्यवस्था कशी करावी. अखेर त्यांनी इंद्राकडून कामधेनु गाय आणि सूर्य नारायणाकडून अक्षय पात्र एक प्रहराकरता मागुण आणले आणि राजा व त्यांच्या सैन्याला इच्छा भोजन देउन तृप्त केले.
राजा सहस्त्रार्जुनांना प्रश्न पडला की, या कुटीमध्ये कांहीही सुविधा नसतांना इतक्या लोकांचे भोजन कोठून आले? जेंव्हा त्यांना कामधेनू बाबत कळले तेंव्हा त्यांनी ऋषि जमदग्नीला कामधेनूची मागणी केली व त्यांनी नकार देताच आपल्या सैन्य बळावर त्यांना मुर्छित केले व बळजबरीने कामधेनू पळविली.
थोडया अवधीने त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला. परशुरामाला त्यांनी सांगीतले की, तुझ्या आईने आपल्या मेहुण्याला जेवण्यास बोलावल्यामुळे माझी अशी अवस्था झाली. तेंव्हा तिला शिक्षा म्हणून तू तिचा शिरच्छेद कर आणि क्षत्रियांचा संहार कर. वडिलांची आज्ञा मिळताच परशुरामाने आपली माता रेणुका हिचा शिरच्छेद केला व पृथ्वी निःक्षत्रिय करण्या करीता क्षत्रियांचा संहार करीत फिरू लागला.
त्यावेळी सिंधु देशावर सोमवंशीय नहुष महाराजांचा वंशज राजा चित्ररथाचे राज्य होते. त्याचे दोन पुत्र महाभोज आणि महाबाहू हे होते. महाभोजाला एक नक्षत्र उर्फ नाडा व श्वेतध्वन उर्फ साडा असे दोन पुत्र होते. नाडाची पत्नी कलावती, त्यांना २१ पुत्र झाले. साडाची पत्नी त्यांना ३६ पुत्र झाले. हे सगळे शूर वीर सामर्थ्यवान असून त्यांनी आपले राज्य अनेक पटीने वाढविले होते पण परशुराम जेंव्हा क्षत्रिय संहार करीत तेथे आला त्यावेळी त्यांना परशुरामाचा मुकाबला करणे शक्य नव्हते म्हणून ते सगळे आपली राजधानी ब-हीस्मति सोडून माता श्री हिंगुलांबिकेला शरण गेले आणि श्रध्दापूर्वक भक्तीभावाने परशुरामा पासून वाचविण्याबद्दल प्रार्थना केली व अभयदान मिळविले.भडोचच्या आपल्या समाजाच्या भाटांकडे हिंदी दोहयांत स्कंद पुराणांतर्गत हिंगुलादिखंड सोमवंश भावसार क्षत्रियोत्पती या नावाचे हस्तलिखित पुराण आहे. त्यात लिहिले आहे की, जेंव्हा पूर्ण श्रध्दाभावाने आपले पूर्वज देवीला शरण गेले तेंव्हा,
" कहे देवी भावसो रखे हम बची हो तुम अब /
भावसार अवटंक कहां बहुताते मुम सब //
माता हिंगुलांबिका प्रसन्न होउन म्हणाली, माझ्यावरील तुमचा भाव पाहून मी तुमचे रक्षण केले आहे. माता हिंगुलांबिका प्रसन्न होउन म्हणाली, माझ्यावरील तुमचा भाव पाहून मी तुमचे रक्षण केले आहे. तुम्हाला आता कोणापासूनही भय नाही, या पुढे तुम्ही सर्वजन भावसार या नांवाने ओळखले जाल. देवी पुढे म्हणाली परंतु तुम्हाला आपली शस्त्रे आपली यज्ञोपवित आणि आपली क्षात्रवृत्ती सोडून घावी लागेल. तुम्ही उपजीविके करता रंगाई आणि शिवणाचा धंदा सुरू करा. आपल्या पूर्वजांनी देवीचे हे म्हणणे कबुल केले. तेंव्हा देवीने त्यावेळी परशुराम त्यांचा शोध घेत तेथे आले त्यावेळी त्याला म्हणाली.
"यह भावसार अवटंकके सेवक इत रहते सदा /
निज शत्रुनको रखो नहीं क्षत्रियपुत्रानको सर्वदा //
हे एकूण परशुराम नाडा, साडा व त्याचे लोकांना न मारता निघुन गेले. कांही कालानंतर ते भावसार क्षत्रिय देवीच्या परवानगीने सोमनाथ जवळील सोरटी येथे आले. तेथे बराच काल वास्तव्य करूण चहुकडे पसरले. त्यातील १४००० लोक उत्तरेकडे काल्पी संध्या आलाहाबाद येथे आले. तेथे त्यांनी गोपाल काला केला व तेथून पून्हा चहुकडे पसरले.
संस्कृत भाषेत असलेल्या हिंगुलाद्रिखंडाचे ७७ पासून ८४ पर्यंतच्या ८ अध्यायावत पुढील कथा आहे. सिंधु प्रांतातील नगर या राज्याचा राजा रत्नसेन परशुराम क्षत्रियांचा नाश करीत येत असल्याचे कळताच आपल्या पाच गरोदर राण्यासह दधीची ऋषिच्या आश्रमात आश्रयास आला. कालांतराने शिकारीस गेला असता परशुरामाच्या हस्ते मारल्या गेला पण त्याच्या पाचही राण्यांना झालेले पांच पुत्र दधीची ऋषिच्या आश्रमात ब्राम्हण पुत्रांप्रमाणे वेदाध्यन करतांना पाहून परशुरामाने त्यांना सोडून दिले आणि एक राजपुत्र जयसेन जो जयराम या नांवाने वावरत होता त्याला आपल्या सोबत नेउन त्याला शस्त्रक्रियेत पारंगत केले. जेंव्हा तो क्षत्रिय आहे हे कळले तेंव्हा परशुरामाने त्याला त्याची शस्त्रविधा निष्फळ होईल असा शाप देउन परत पाठवून दिले. तेंव्हा दधिची ऋषिनी परशुरामाच्या शाप विमोचनार्थ त्याला श्री हिंगुलांबीकेला शरण जाण्यास सांगितले, देवीच्या वर प्रसादाने त्यांना जीवनदान मिळाले ते देवीच्या व आज्ञेनुसार विश्वकर्माच्या दाखविलेल्या उपजिवीका रंगाई आणि शिवणकला करून ब्रम्हक्षत्रीय या नांवाने वावरत आले.
महाभरतात शांतीपर्व अध्याय ४९ प्रमाणे धरित्रीने आपल्या परीपालनार्थ राजे नसल्याने कश्यपास बोलावून लपून बसलेल्या राजांना परत बोलावण्यास सांगीतले त्या नुसार कश्यपाने त्यांना त्या त्या राज्यात अभिषिक्त केले. देवी हिंगुलाबीकेच्या कृपेने आपल्या पूर्वजांनी बहुकालपर्यंत राज्य केले. पण मोगल बादशहा, बाबराच्या जेंव्हा स्वा-या झाल्या तेंव्हा परशुरामाच्या शापामुळे त्यांची शस्त्रास्त्रे निष्फळ होउन त्यांना पराजय पत्करावा लागला व त्यांना रंगाई, शिवणकला इ. उपजिविकेचे साधन स्विकारावे लागले परंतु कालांतराने सर्व परिस्थिती बदलत गेली व भाज भावसार समाज बांधवांनी सर्व क्षेत्रात आपले स्थान प्रस्तापित केले आहे. जसे की, सर्व भारतभरात भावसार समाज हा विविध क्षेत्रात जसे उद्दोग, शासकीय सेवेत, व्यापारात, कला अश्या विविध क्षेत्रात भावसार समाज कार्यरत आहे.
संकलन - स.भु. श्रीराम मारोतराव गर्जे , उपाध्यक्ष महाराष्ट भावसार समाज तथा श्री हिंगुलाबीका देवी मंदिर विश्वस्त मंडळ, परभणी